Total Pageviews

Friday, April 24, 2015

पुण्यात! ...this time in Pune with different lens

TISS आणि त्यातल्या त्यात social work म्हटलं कि fieldwork म्हणजे खूपच महत्वाचा भाग. ह्या वेळी एक महिना पुण्यात राहायला मिळणार म्हणून Fieldwork खास होत. तस ह्या शहराशी एक वेगळच नात आहे इतक्या वर्षांपासून.. पण ह्यावेळी सर्व काही थोड वेगळं  होत. INHAF: Habitat Forum सोबत आम्हाला एका शोध अभ्यासावर काम करण्याची संधी मिळाली.
जागतिकीकरण आणि वाढतं शहरीकरण आपल्या सर्वानांच भुरळ घालतं. आपल्या सारख्यांना smart city वगैरेच विशेष कौतुक. आपल्या सारखीच खूप सारी माणसं ह्या शहराचा अविभाज्य भाग असतात. त्यात खूप महत्वाचा role  तो कामगार वर्गाचा. आपलं दैनंदिन जीवन सुरळीत व्हाव म्हणून अहोरात्र राबणारा हा श्रमिक वर्ग. आपल्या शहराच्या सुशोभीकरणात मात्र ह्याला तिळमात्र स्थान नाही.
ह्या शोध अभ्यासात आम्हाला शहरातल्या 'गरीब' आणि 'गरिबी'चा आढावा घ्यायचा होता. भारतासारख्या देशात 'गरिबी' आणि त्यात येणारे 'गरीब' ह्यांना विशेष महत्व. (निदान कागदोपत्री तरी आहेच) वेगवेगळ्या व्याख्या आल्या, निकष सुचवले गेले. आणि हे सर्व काही वादविवादात विरून गेले. त्यांतून आलेल्या अनेकाविध योजना पण त्या अमलात येताना येणाऱ्या अडचणीहि अनेक. त्यांचे फायदे गरजूंपर्यंत पोहाचेपर्यंतच्या असंख्य भ्रष्ट गाळण्या. हे आणि अस खुप काही. गेली अनेक वर्षे किमान व्याख्या बदलण्याचीही तसदी सरकार दरबारी कुणी घेतलेली नाही. अशा परिस्थितीत आम्ही पुण्यातल्या काही लोकांना भेटून सद्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात वेगवेगळ्या ६ कामगार संघटना सोबत काम करायला मिळाले.
एकूण एक महिन्यातल्या कालावधीत ६ कार्यशाळा, संघटनांना भेटी, मुलाखती ह्यातून अनेक पैलू समोर आले. प्रत्येक कार्यशाळेत सहभागी होणारे लोक वेगळे, त्यांची काम, उत्पन्न, परिस्थिती अन अडचणीही वेगवेगळ्या. त्यातून थोडेसे-
सरकारी योजना आणि फायदे
योजना अनेक आहेत पण बहुदा माहितीचा अभाव आणि कुठे कागदपत्रांचा अभाव लोकांना फायद्यांपासून वंचित ठेवतो. काहीना वयाच्या, जातीच्या अटी जाचक वाटतात. कुठे एकटी म्हणून स्त्रीला तिचे अधिकार नाकारले जातात. बहुतेकांनी हेच सांगितले कि योजना आहेत पण फायदे मिळत नाहीत. मग ते राशन असो व विमा. फायदा न मिळण्याची एक न अनेक कारणे.
निकष
'गरीब' म्हणून व्याख्या करताना लावले जाणारे निकष लोकांना अपुरे वाटतात. त्यांच्यामते फक्त 'nutrition' हा निकष नसावा. ते उलट प्रश्न करतात - 'जेवणाविना आणि काही लागत नाही का?' त्यांचे अजून एक म्हणणे असे कि- 'आमच्या श्रमाच्या तुलनेत सध्याचे निकषही खूप तुटपुंजे आहेत.'
गरज
गरजा! लोकांच्यामते बदलत्या गरजा लक्षात घेतल्या जात नाहीत. जसे सध्याच्या निकषांनुसार mobile असणारी व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली मानली जात नाही. पण लोकांचे म्हणणे असे- 'mobile तर आजकाल गरज झालीय.' एका कार्यशाळेतून आलेला अप्रतिम निकष म्हणजे 'सांस्कृतिक खर्च'! 'दिवस भर राब-राब राबणाऱ्या आम्हाला मनोरंजन करायला काही नको का?'- असाच त्यांचा खडा सवाल.

आपल्या अलिशान घरात राहतांना आपण सहज विसरतो कि घराची, परिसराची साफ-सफाई करणारी माणसं मात्र कुठे तरी वस्तीत अगदीच थोड्या जागेत राहताय. त्या वस्त्यांना 'वस्ती' म्हणूनही गणलं जात नाही. वाढत्या जागेच्या किमती आणि त्यामुळे स्वतःच घर नसणं तर आलंच. पण जे आहे तेही 'legal' नाही त्यामुळे पाणी, वीज आणि इतर सोयी-सुविधांचा अभाव. एक दिवस कचरा नेला नाही तर आपली कित्ती चीड-चीड होते पण तो कचरा उचलून, वेगळा करून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या ताईंना येणाऱ्या अडचणींचा आपण कधी विचार केलाय? कधी तरी दुष्काळामुळे गावाकडून शहरात आलेली हि माणसं. शिक्षण आणि कौशल्यांचा अभाव (काहींना जातीचा विळखा) त्यांना हमाल, रिक्षा चालक, पथारीवाला, सफाई कामगार म्हणून काम करण्यास भाग पाडतो. त्यातून मिळणारे उत्पन्नही तितकेच. काही घरात कमावणारी व्यक्ती एकटीच अन अवलंबून असणाऱ्या व्यक्ती जास्ती. खूप साऱ्या घरात एकटी कमावती महिला! निदान आपल्या मुलांनी शिकाव म्हणून त्यांची धडपड पण खाजगीकरणात गुरफटून असणारी आपली शिक्षण पद्धती आणि खालावत जाणारा सरकारी शाळांचा दर्जा. सारच काही त्यांच्यासाठी कठीण होऊन बसलय.

Fieldwork तसं खूप काही शिकवून जातं. पण खडतर वास्तवाची जाणीव तेव्हा होते जेव्हा मी टाकून दिलेला कचराही कुणाच्या उपजीविकेच साधन आहे हे कळून येतं. खर तर अभ्यासाच्या अनुषंगाने लिहिण्यासारख खूप आहे. पण वेगळ म्हणजे ह्या एक महिन्यात पुण्याचा एक वेगळा चेहरा पाहायला मिळाला. Real Estate, FC Rd /JM Rd /Kalyani Nagar/ Amanora/ Magarpatta, Hinjewadi आणि वाढता IT चा पसारा-- या व्यतिरिक्त पुण्यात वास्तवास आहेत अनेक अशा वस्ती जिथे रोजच्या जगण्याची स्पर्धा, आपल्या मुलभूत गरजा पूर्ण करण्याची धडपड सुरुय. आपल्या अधिकारांसाठीचा लढा हळू-हळू जन्म घेतोय.

Saturday, April 5, 2014

Do we really have an option?

फेसबूकची भिंत रंगून गेलीय निवडणुकीच्या वार्तांनी, 'वोट करा' म्हणून आवळल्या गेलेल्या जाहिरातींनी.. आणि मला आज एक प्रश्न पडला म्हणून पुन्हा एकदा नेहमी प्रमाणेच खरडल्या चार ओळी. (तेवढच आपला बुद्धीविलास केल्याचं समाधान)
देशाची पूर्ण वाट लागली असून आपला सर्वांच्या आयुष्याचा मस्तपैकी सत्यानाश झाल्यावर नेहमीप्रमाणे सर्व नेत्यांनी छाती ठोकून ठोकून पुन्हा एकदा सिद्ध केलंय कि ते कित्ती लायकीदार आहेत आणि फक्त आणि फक्त त्यांना निवडून दिल्यानेच कसे आपले भले होणार आहे. मग कुठे तरी माझ्या एका वर्ग मित्राने मोदींच्या चिंध्या उडवून स्वत:च्या मनाची शांती करून घेतली,  टोकाला जायचं तर लायकी नसतानाही काँग्रेसला मत देण्याचे सूतोवाचही करून तो मोकळा झाला. पण त्याने एक बरं केलं, हे सांगून कि आपल्याकडे काही Option च नाहीये.
खरंच… Do we really have an option? कुठे उमेदवाराची लायकी नाही कुठे पार्टीच्या नावाने बोंबाबोंब. मतदारांमध्ये जागरूकता पसरवणाऱ्या एका चित्रफितीत नेत्यांची माहिती देणाऱ्या App मधे असणारा 'Criminal Background' चा option म्हणजे आपल्या लोकशाहीला मोठा धब्बाच आहे. अशातच 'बेहती गंगामे हाथ धोनेवाले' काही कमी नाहीत. मग दिशाभूल म्हणा किंवा गोंधळ म्हणा, तो होतो तुमच्या आमच्या सारख्या सर्व सामान्यांचा.
आज मतदान अगदी जवळ आल्यावर खरच प्रश्न पडतो कि 'मत द्यायचं कुणाला?' नक्कीच असं माझ्यासारख्या खूप जणांना वाटतय. Option च नाही म्हणून मत न देता सुट्टीचा फायदा घेऊन Picnicला जायचे बेतही आखले असतील काहींनी.
पण खरंच! 'मत द्यायचं कुणाला?' व्यक्तीला? पक्षाला? व्यक्तीला मत देऊन काही पडेल का? खरंच काही चित्र बदलेल का?
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे' ह्या शाळेत शिकलेल्या वाक्याचा अर्थ आत्ता कुठे उलगडू लागलाय. आत्ता कुठे मताची खरी किम्मत कळू लागलीय. पण तरीही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या…, गरिबी विसरता यावी म्हणून दारू पिउन चिंग होणाऱ्या…, आजही प्यायच्या पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या…, भूकमारीन मरणारी आपली लेकरं हताश होऊन पाहणाऱ्या…, गारपिटीने झोडपल्या गेलेल्या.... आम्हा जनतेला माझ्या बुद्धीजीवी मित्रांनी नक्की सांगाव, कि मत आम्ही कुणाला द्याव?

Sunday, January 5, 2014

राजकारण आणि आजचा तरुण!

निवडणुकांचे वारे सर्वी कडूनच जोरात वाहू लागलेत. राजकारणात नुकत्याच झालेल्या दिल्लीतील निकालाने तरूणाइची एक नवीन लाट राजकारणात येऊ पाहतेय. तसा तरुणाईचा आणि राजकारणाचा सहवास खूप जुना पण एका नव्या विचाराणी, नव्या जोमानी येणारी हि नवीन पिढी आज राजकारणाला खऱ्या अर्थानी बदलू पाहतेय. पण का खरच चित्र बदलतंय? ह्याचा थोडा उहा-पोह……
योगायोगाने ह्या पुणे भेटीत काही राजकीय घडामोडी जवळून पाहण्याचा योग आला. त्यातलाच एक छोटासा अनुभव म्हणजे एका तरुण नेत्याला भेटायला आलेला तरुणांचा घोळका! आणि निमित्तच झाल लिहायला. 31st Dec ची रात्र. निम्म्याहून जास्त तरुणाई जेव्हा झिंगण्यात मस्त असेन तेव्हा ह्या तरुणांना तिथे येणं, बोलणं गरजेच वाटल... त्यासाठी त्याचं नक्कीच कौतुक. गावाकडून इकडे शिक्षणासाठी येणं, ते शिक्षण करताना धडपड काही कमी नाही, अडचणीही अनेक पण तरीही गावाकडच्या राजकारणात रस घेणारी, आपल्या परीनं योगदान देणारी हि लोकं पाहून कुठेतरी मनात समाधान वाटत होत. त्यानंतर तुळजापुरात तरुणाई अन राजकारणावरची चर्चा, पथनाट्य ह्यांनी तर डोकं ढवळून काढलं आणि विचारचक्र जोरात फिरू लागलं.
आजकालची तरुणाई बेताल, बेधुंद! त्यांना कशातच रस नाही! एकीकडे असले आरोप आणि एकीकडे सक्रिय असलेला हा तरुणाईचा लोंढा! पण तरुणांच्या चळवळीला का खरच न्याय देते आजचे राजकारण आणि राजकारणी? कि स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त त्यांच्या कौशल्यांचा वापर करून घेतला जातोय? मोठ-मोठी अन चक्क खोटी रामराज्याची स्वप्न किती दिवस दाखवली जाणार आहेत आपल्याला?
मी आजचा भारतीय तरुण !
हातात Degree आहे पण नोकरी नाही.
मी चळवळीत उभा आहे... पण चळवळ कसली? का? हे मला ठाऊक नाही.
आंदोलनाचे मुद्दे मला पटोत अगर न पटोत, हातात माझ्या झेंडे! पाठीवर पोलिसांचे दांडके पण माझ्याच!
नेत्याचा हेतू मला कळो न कळो, त्याच्या सभांना मी गर्दी करणार! त्यांनी दोस्त म्हणून खांद्यावर हात ठेवला, म्हणजे माझं आयुष्य फळणार!
होय! मी आजचा भारतीय तरुण!
अन दोष का फक्त ह्या राजकारण्यांचा?
नाही! खरं तर दोष आपला सर्वांचाच. आपण आपल्या डोळ्यावर झापड बांधून जगतोय. स्वतःच स्वतःची फसवणूक करून घेतोय. 'भारत हा अनुयायांचा देश आहे!' आणि आजही आपण डोळे बंद करून अनुयायी होऊन त्या गर्दीचा भाग होतोय. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीने आपल्याला आंबेडकर, गांधी, टिळक नाही दिले तर त्यांचे विचार दिले. पण नेहमीप्रमाणे आपल्याला हवेत पुतळे! प्रसंगी फुलहार घालून उत्सव करायला अन प्रसंगी चपलांचे हार टाकून दंगली करायला. आपल्याला हवेत नेते, चुकांचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडायला. आपण फक्त जमाव बनवण्यात त्यांची मदत करतोय.'प्रत्येक सक्रिय कार्यकर्ता हा उच्च महत्वकांक्षा असलेला राजकीय नेता असतो ' अस वाचल होतं. पण आपली उडी फक्त इतरांची खुशमस्करी करण्यापर्यंतच.
'India is a nation where we have plenty politicians but not a single political leader.' आणि हाही का प्रस्थापित राजकारण्यांचा दोष?
'शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात' ह्या मनोवृत्तीतून आपल्यातून कुणी पुढे येत नाही. आपण प्रश्नच विचारत नाही. कारण प्रश्न करायला आपल्याच संकल्पना अजून स्पष्ट नाहीत. आपण कोणत्या बदलाची आशा करतोय? कोणत्या उद्याच्या भारताची स्वप्न पाहतोय? आणि का खरच ह्या राजकीय नेतृत्वाची लायकी आहे आपली ती स्वप्न पूर्ण करण्याची? हे सारे प्रश्न आज आपणच स्वतःला विचारले पाहिजेत. प्रवाहासोबत वाहत जाण्याची वृत्ती बदलण्याची अत्यंत गरज आहे.
इतिहास आपोआप घडत नसतात, ते घडवावे लागतात. संपूर्ण पिढी जेव्हा एका विचाराने भारावून जाऊन एकत्र येउन होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देते. तेव्हाच क्रांती घडून येते.
निदान आतातरी हे अंधपणाने अनुयायी होणं, झेंडे घेऊन सभेला गर्दी करणं आपण थांबवणार आहोत का? आतातरी मुल्यांची, विकासाची लढाई आपण लढणार आहोत का? कुणाचीतरी चमचेगिरी करण्यापेक्षा, डोळसपणे समाजाच्या आणि पर्यायी स्वतःच्या विकासासाठी उभे राहणार आहोत का? हा सवाल आपण सर्वांनी स्वतःला विचारायची गरज आहे.


Monday, October 22, 2012

शोध सुरु आहे...देवाचा!

आस्तिक आणि नास्तिक... तसे दोनीही माझ्या जवळच्या मित्रांतीलच.. पण दोन्हींचे विचार वेग वेगळे.. एकाला परमेश्वर मूर्त रुपात देवालयात आहे अस वाटत तर दुसऱ्याला देवाच्या असण्यावरच आक्षेप आहे.
अशावेळी का कुणास ठाऊक पण नकळत आपण स्वतःलाच विचारू लागतो.. तू कोण आहेस? आस्तिक कि नास्तिक? खरच काय वाटत मला.
देवाच्या भरवश्यावर मी आजवर तरी काही सोडलेलं नाही. स्वतः मेहनत करून मिळवला सर्व पण मग मी कुठे देवाच अस्तित्व नाकारलं?? देवळात तर मीही जाते, कित्तीदा त्या मूर्तीशी वाद घातले, दोष दिले, संतापहि केला... आणि कधी कधी निरव मनःशांतीहि अनुभवली. पण साक्षात्कार कधी अनुभवला नाही... किंवा अनुभवला मी साक्षात्कारही... पण 'स्व' चा साक्षात्कार होता तो... स्वतःच्या कुवतीचा, कौशल्याचा, कर्तृत्वाचा साक्षात्कार होता तो..
चला देव आपल्याला दिसत नाही म्हणून आपण त्याच अस्तित्व नाकारुया पण मग ह्या सृष्टीचा रहाटगाडा चालतो तरी कसा? त्याच्या नसण्याचा तरी काय पुरावा?
आणि  जरी देव असला तरी त्याला हे कर्मकांड पटत असेल का?
त्या नास्तिक बुद्धीवाद्याचे विचार मन उद्विग्न नक्कीच करतात पण मग हजारो च्या गीनतीन वारी ला जाणारा तो सर्व सामान्य वारकरी?? त्याची श्रद्धा? त्याच्या भावना? त्याचं काय? त्यांना थोडीच कळतात हे युक्तिवाद?
देव, धर्म , सत्य हे शब्द खूप मोठे आहेत खर तर.. त्यावर बोलण्याची अजून माझी कुवतही नाही. पण मला समजून घ्यायचंय हे सारं!
कोण विधाता? कुणाची निर्मिती? आणि कुणाचा साक्षात्कार?
माझाच मलाच झालेला साक्षात्कार??????
आपण त्याच्याकडे कित्ती अपेक्षा करतो त्याच स्वतः कडून केल्या तर??असो प्रश्न इतके आहेत पण उत्तर अजून माहित नाहीत...
शोध सुरु आहे... त्याचा! देवाचा!

Tuesday, September 4, 2012

वंदावी तुझी पावले -- शिक्षक दिन विशेष


ह्या जगात सर्वात पवित्र, निर्मळ आणि निःस्वार्थ नाती दोनचं! एक मातेचं आणि दुसंर मास्तरांचं! आई जन्म देते तर मास्तर जीवन जगण्याची कला शिकवतात आणि आमचं सौभाग्य, ती कला शिकवणारे मास्तर दुसंर कुणी नसून तुम्ही आहात.
'आपण ह्या समाजाचे घटक आहोत आणि म्हणून त्या समाजासाठी काही केलं पाहिजे..' हे खुपदा ऐकलं होत पण त्याचा खरा अर्थ तुम्ही समजावून सांगितला. यापूर्वी खुपदा वाचलेले गांधी, विवेकानंद आज नव्यानी कळले. जीवनाचे खूप सारे संदर्भ तुम्ही समजावून सांगितले. प्रसंगी आमच्या भल्यासाठी स्वतः त्रास सहन केलात. कधी आईची माया दिली.. कधी बापाचा धाक तर कधी भावाचा आधार... सगळ्या भूमिका अगदी चोख बजावल्यात. एखाद्या जादूगारा प्रमाणे तुम्ही आम्हा सर्वांमधलं चांगल हुडकून ते समाज हितासाठी कसं वापराव हे नेमक शिकवलंत... कधी निराशेत धीर दिला आणि स्वप्न पाहण्याची नवी उमेद.. नुसती स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात ती पूर्ण करण्यासाठी ध्येय वेड होऊन स्वताला झोकून द्याव लागत हे ही तुम्हीच शिकवलत. 'बदललेल्या काळात काही संदर्भ जुनेच आहेत म्हणून बाळ सामान्यांच्या डोळ्यातला सूर्य जरी नाही बनू शकलीस तरी पणती हो. प्रकाशाने अंधार भेदाला जातो यावर लोकांचा विश्वास जागा ठेव. ' म्हणत कायम आम्हाला मार्गदर्शन केलंत. म्हणूनच तुम्ही आम्हा सर्वांचे दीपस्तंभ आहात!
अजूनही आठवतो तो शाळेतला तास... पाटील सर अत्यंत रंगवून 'कणा' कविता शिकवीत होते. कवितेमधला पूर प्रत्येकाच्या पापण्याच्या कडांशी आला होता आणि सरांनी कवितेचा समारोप केला, 'सर,पाठीवरती हाथ ठेवून नुसतं लढ म्हणा..!' पण खर सांगू का सर, पाठीवर नुसतं हाथ ठेवून उभारी द्यायला मास्तर पण तसा दमदार लागतो...तुमच्या सारखा!
" गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर:।

गुरूरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:॥ "
आणि असा गुरु मला लाभले हे माझ सौभाग्य! पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी रास्त प्रयत्न करण्याचा आशीर्वाद द्या सर..
--- शितू

Friday, August 31, 2012

बदल.... The Change!

सध्या सगळीचकडेचं बदलाचे वारे जोरात वाहू लागलेत...
बदल.... change.. अनिवार्य आहे. सगळी कडूनच system बद्दल असंतोष व्यक्त केला जातोय. काही ठिकाणहून त्यावर मात करण्यासाठी जोमाने प्रयत्नही चालू झालेत. अशावेळी मी ह्या परिस्थिती कडे एका third person point  of view नी पाहते आणि मन अस्वस्थ होत. मुठभर लोकांची धडपड आज करोडो भारतीयांचे आयुष्य बदलू पाहतेय. पण तरीही आपण शंढासारखे हातावर हात धरून फक्त गम्मत पाहतोय. air conditioned  खोलीत बसून बदल व्हावा म्हणून चर्चा करतोय. पण सुरुवात? ती कुणी करावी? कित्ती दिवस आपण कुणी तरी येऊन आपल्याला तारून नेईल म्हणून वाट पाहणार आहोत? कित्ती दिवस केवळ चर्चा रंगविणार आहोत? अणि कित्ती दिवस 'इस देश का कुछ नही हो सकता' म्हणून केवळ टिका करणार आहोत? कुणी तरी पुढे येईल आणि मग आपण मागून जाऊ.... का?
आपण करूयात ना सुरुवात...
आधी आपल मन साफ करू... मग घर... मग परिसर... आपोआप देश साफ होईल... कित्ती सोप सूत्र आहे... नाही? पण नाही... आपण त्याला कठीण बनवलंय... आपल्या सोयीसाठी...
लोकांची गर्दी केव्हा झाली कळल नाही मग सगळीकडे रांगा लागू लागल्या...मग आपोआप ती गर्दी...त्या रांगा चुकविण्यासाठी आपणच पळवाटा शोधून काढल्या.
भ्रष्टाचारी--- 'राजकारणी'... आणि आपण? दुसऱ्याला दोष देऊन आपण मोकळे होतो.... कित्ती सहज... कधी तरी अंतर्मुख होऊन विचार केलाय... 'मी स्वतः काय करतोय?'
कामात, शिक्षणात एकूणच सर्वात गुणवत्ता हवी... पण जे माझ्यातच नाही ते कामात कुठून येणार...? जे मीच देऊ शकत नाही ते मला मिळावं अशी अपेक्षा तरी किती रास्त आहे? कधी विचार केलाय?
कायमच अपेक्षा दुसऱ्यांकडून...का?
मी.... माझ्या पासून करूयात सुरुवात... बदलाची... कारण तुम्ही आम्ही मिळून एक system बनते... system आपल्यासाठी आहे... आपण system साठी नाही... 
आज एक पाऊल आपण पुढे येऊ.. आपण बदलू.. समाज आपोआप बदलेल...
कारण बदल अनिवार्य आहे..Change is Inevitable ...फक्त तो चांगल्यासाठी व्हावा हे महत्वाचं..





[ आज मला पुन्हा एकदा विश्वास वाटतोय... What do you think?
If yes then what are we waiting for... Let's change the world... :) :) ]

Saturday, August 4, 2012

रक्षाबंधन!

लहानपणा पासूनच ह्या सणाचं मला खूप अप्रूप राहिलंय...कित्ती तयारी करायचे...हातानी राखी बनविण्या पासून ती तुझ्या हातावर बांधी पर्यंत...आणि मग तुझ्या कडून मिळणार गिफ्ट.. खुपदा आधीच तुला आवर्जून hint दिलेली असायची कि मला काय गिफ्ट हवंय...आणि तू द्यायचासही... अगदी वर्ष्याच्या सुरुवाती पासून पैसे जमवायचास ना... त्यासाठी... दिसा मागे दिस आणि वर्षांमागे वर्षं सरली...
आज रक्षाबंधन आहे आणि आपण दोघे दोन वेगळ्या शहरात.... दादा तुझी खूप खूप आठवण आली... गावातल्या दुकानांवर इकडे खूप लगबग होती. सासुरवाशी मुली छान नटून भावाकडे जायला निघाल्या होत्या. पोरांच्या कपाळावर टिके आणि हातावर राख्या झुलत होत्या. मी हि घेतली एक राखी तुझ्यासाठी. पण त्यात ती राखी बनाविण्याची गम्मत नव्हती...एक एक धागा निवडून तो विणताना जणू आपल्या नात्यालाच विणायचे मी...आणि एवढ सर्व करतांनाही तुझ्या आवडीचा रंग...तुझ्या आवडीची design आणि बरंच काही ध्यानी ठेवाव लागायचं...त्यासाठी पैसे जमविताना कित्ती कसरत करावी लागायची...नेमका कुठे तरी रुपयाच कमी पडायचा... तो आई हळूच गल्ल्यात टाकून द्यायची...कळत-नकळत.. आज मात्र खूप options होते...designs होते... इतके कि मलाच प्रश्न पडला होतो नेमका घेऊ काय..? मग क्षण भर डोळे मिटले आणि तूला आठवलं.. साधासा तू... अगदीच कुणाच्या नजरेत भरावास असाही नाही पण अगदीच कुणी लक्ष देणार नाही असाही नाही... शांत.. संयमी... अगदी माझ्या विरुद्ध... आणि सगळ्यात साधी...नाजूकशी राखी उचलली मी....तुला आवडेल आणि शोभेल अशी... तुझ्या सारखीच...!
आजकाल राखी चटकन पोहचावी म्हणून courier करतात...मी ही केल...आणि घरी परतायला निघाले...
सगळ्या आठवणी जाग्या झाल्या...
तुझा जन्म...तुझं बालपण.. आपले खेळ... आपली भांडण.. चर्चा.. गप्पा... आणि बरंच काही...
खेळताना कित्तीदा धडपडायचास तू...लागायचं तुला...आणि रडायचे मात्र मी...आणि वर तू डोळे पुसून मलाच म्हणायचास, 'दिदू फार नाही ग लागलय.. रडू नकोस...' आणि मला लागल्यावर मात्र तुझ्या चेहऱ्यावर चिंता घर करायची... दाखवायचा नाहीस तू पण मला माहितीये कि त्रास तुलाही व्हायचा. तुझ्या यशात कित्तीदा उर भरून आला अभिमानाने आणि माझ्या अपयशात तू नेहमीप्रमाणे पाठीशी उभा होतास मला धीर देत...कधी कधी घाईत अधाशासारखे एकाच पानात खायला बसायचो...आणि शेवटचा घास आवर्जून एकमेकांसाठी ठेवायचो... आणि तो घास तसाच रहायचा.. काहीही खाऊ मिळाला कि त्याचे दोन भाग न सांगता व्हायचे.एक तुझा आणि एक माझा... ते कित्तीही सारखे असले तरी त्यात तुला वाटला म्हणून एक मोठा भाग तू मला द्यायचास.... पपांच्या budget मध्ये आपली खरेदी adjust व्हावी म्हणून तू नेमही 'सध्या काही नको' म्हणून मला खरेदी करायला सांगायचास...आणि माझी खरेदी दुरून कौतुकाने पहायचास...आणि तुझ्या खरेदीला मात्र माझ्याशिवाय कधीच नाही जायचास... शाळेत कित्तीदा तुझी स्पर्धा माझ्याशीचं व्हायची... आपली इच्छा नसतानाही...पण तू मात्र तुझं वेगळेपण सिद्ध केलस आणि तेव्हा सर्वांत जास्त खुश मी होते. आज पपा नाही म्हणणार नाहीत पण तरी 'का उगाच खर्च?' अशी ठाम टिपणी देऊन तू माझीच scooty वापरतोय, आनंदात...!
कस जमत रे तुला नेहमी अस दुसऱ्यासाठी जगायला? माझ्या आनंदात खुश व्हायला..? माझ्या संतापात ऐकून घ्यायला..? असमाधानाची साधी रेषाही नसते त्या शांत, निर्विकार चेहऱ्यावर...
आपल नात celebrate करायला आपल्याला हा खास दिवस लागत नाही कारण ते प्रत्येक श्वासागणिक जिवंत असतं, माझ्यात आणि तुझ्यात आपल्या आठवणीमधून..पण तरी आज तुझी खूप खूप आठवण आली....
मला माहितीये तू खूप आतुरतेने वाट पाहत असणार राखीची... आणि मिळाल्या बरोबर लगेच बांधून घेशीन...नंतर मग नेहमीसारखी जपून ठेवशील तिला, तुझ्या कपाटात...
आठवणी आठवणी आणि फक्त आठवणी...डोळे पाणावलेत लिहून...आणि मला माहितीये वाचून तुझेही डोळे आत्ता भरून आलेत... हो ना?
देवा माझ्या भावाला उदंड आयुष्य दे...त्याच्या स्वप्नांना आभाळाचे पंख दे आणि प्रयत्नांना तुझ्या आशीर्वादाची जोड दे... आणि मला काही नको...